गुरुवार, ३ मार्च, २०११

जीवन म्हणजे ....

जीवन म्हणजे संघर्ष
कधीच नसतो
जीवन म्हणजे नदीचा
प्रवाह असतो.....
ज्याला ओढ असते
वळणांची
ज्याला ओढ असते
ध्येयांची...!!

आई..

’आई’ असते पहिला गुरु
सारया जगताचीच ती ’कल्पतरु’..

ओल्या मातीच्या गोळ्याला आकार ती देते
तिच्या बिलाची पावती सदैव रिकामीच असते

आयुष्याच्या अखेरही मुखी नाव असते
’आई’ हेच ते अतुलनिय नाम असते

’आ’ म्हणजे ’आत्मा’,’ई’ म्हणजे ’ईश्वर’..
मातेचा विजय असतो सृष्टीच्याही अखेर...!!

मी शोधली आहे

आज जखमेवर माझ्या मीच मलम लावू लागली
गतकाळाला माझ्या कोपरयातून पाहू लागली
वाटत होती पहाडाएवडी ती गोष्ट आज निष्फळ ठरली
उगाचच दु:खाला मी चघळत राहीली
.
.
.
मग खिडकीतून तिरीप उन्हाची नकळत बिलगून गेली
रात्र सारी जागून काढली तेव्हा जाणीव झाली
रातीसोबत गतकाळालाही मागे सोडलं मग
कोंब फुटून ’आशेनं’ नव्याने धरीला तग...
आकांक्षांच्या पंखांना आता बळ दिलं
’उडूया नव्याने’ मनाला आव्हान केलं
.
.
जखमेवरही आता खपली धरली आहे
माझ्यातल्या ’मला’ मी शोधली आहे

सुरुवात :एक अभंग

विसरले आहे
कालचे मी सर्व
सुरु नवे पर्व
केले आता ॥१॥

आकांक्षांच्या पंखा
दिली नवी दिशा
मनी आता आशा
जिंकण्याची ॥२॥

मार्गात आलेले
झेलेणं हरणं
पेलेणं जिंकण
स्थितप्रज्ञी ॥३॥

जिवीत ध्येयाची
जिद्द आहे उरी
अपयश जरी
झेललेले ॥४॥

एक नवा सुर्य
उगवतो आहे
माझ्याकडे पाहे
आशेतुन ॥५॥

तेजोमय रुप
घेतले ते आत
पसरुनी हात
स्वयंस्फूर्ते ॥६॥

माय मरतेय

रस्त्यांवरुन,कार्यालयांतुन..
राजधानी मुंबईतुन..
रोजच मी पाहतेय....
’मायमराठी’क्षणोक्षणी मरतेय...!!


’सर्व शिक्षा अभियान’झाले दिल्लीत
’शिक्षा’चे’शिक्षण’ न केले मुंबईत
ईमान राखीत दिल्लीशी
’शिक्षाच’गेली खेड्यापाड्यात
सांगा खरच ’मराठी’ टिकतेय....?
लोकहो.. माय माझी रोज मरतेय...!!


मुख्यमंत्री होताच
’मुंबई’ चे ’बंबई’ केले
अवघ्या नांदेडात मग
’मराठी’ बोलणे कठीण झाले


पाटी विमानतळावरची हिंदीत पाहीली
’मराठीबाण्याने’चौकशीस मी धजली
’निकास’ म्हणजे ’बाहेर’ नि
’पूछताच’ हिच ’चौकशी’...
हिच तर मराठी म्हणून ’जनता’मला हसली


’पिवळे ते सोने नसते....
देवनागरीतले सारे मराठी नसते’...
कळण्यास खुप उशीर होतोय..
तोवर मायेचा लचका कुठेतरी तुटतोय ...!!


खुर्च्यावाल्यांना नसेल मायेची फिकीर
माय सांगतेय तु सोडू नकोस धीर
...मी धीर नाही सोडलाय...
नाळ तिश्याशी जोडलाय...
वाचवायचा तिला जरी प्रयत्न करतेय....
रोज माय तरी कुढत कुढत जगतेय...!!


(श्रिपाद ब्रह्मानंद पांडे लिखीत ’लिपीसाधर्म्याआडून मराठीवर अविरत वार’ लेखावर आधारीत(दिनांक:५/१/२०१०))

कळी फुलली......

एक होती कळी
खोलत नव्हती पाकळी
जाऊन तिच्या जवळी
म्हटले तिला खुळी

कळी हलकेच हिरमुसली
मग कहानी सांगू लागली
"किरणास आजवर न बिलगली
भ्रमरासोबत कधी न गुणगुणली
फुलण्याची आशा मनीच कोमेजली"
.
.
तिला म्हटले "अग खुळे
निट उघड डोळे
नि बघ जग वेगळे
तुझ्याहूनही दु:खी सगळे
तरी फुलवी सुंदर मळे
जगण्याचे तंत्र त्यांस कळे"
.
.
पाहुन तिच्याकडे पुन्हा हसले
तुझ्यासारखी मुङ होते म्हटले
’फुलण्याचे’ कर्तव्य उमगले
भ्रमराचे वेड मग पळाले
.
.
कळीला जगण्याचे ’सारं’ समजले
तिचे शंकानिरसन झाले
हलकेच तिने अभिवादन केले
कळीला तेव्हा मी फुलताना पाहीले....!!

...................

क्षितीजावर टेकेल आभाळ
वाट ही पाहिली
सावली होशील माझी
साहिली कधि काहिली
जल नव्हे मृगजळ तू
तहानलेली राहिली
वळणावर आज पुन्हा
जाहली मी एकली
-----अपेक्षा चौधरी